वर्तमान संदर्भात
पश्चिमी भांडवलवादी विकासनमुना आणि वामपंथी साम्यवादी विकासनमुना - हे दोन्ही नमुने आपापल्या अंगभूत मर्यादांनी असफल झालेले लक्षात आल्यामुळे जगातील गणमान्य विचारवंत, समाजशास्त्रज्ञ, अर्थनीतिज्ञ, राजकीय चिंतक मानवी समाजाच्या विकासाच्या तिसऱ्या पर्यायाचा शोध घेऊ लागले आहेत. एकूण जागतिक परिस्थितीची वरवर दखल घेतानाही लक्षात येते की पश्चिमेतील
( व पश्चिम राष्ट्रांच्या आर्थिक व सामरिक प्रभावामुळे विकसनशील देशांतील) विकास नमुन्यांचा असफलतेमुळे निर्माण झालेली निर्वाणी ही कोणत्याही या किंवा त्या विशिष्ट विकासनमुन्याच्या संदर्भातील नसून मूलत: गेल्या 4-5 शतकांमध्ये पश्चिमेत विकसित झालेल्या, मानवी व्यक्तिमत्वाचा व जीवनाचा खंडश: विचार करणाऱ्या विशिष्ट भौतिकताप्रधान जीवनदृष्टीच्या असफलतेतून निर्माण झाली आहे. (पश्चिमी सांस्कृतिक व्यस्ततेच्या अधिक विवरणासाठी 'एकात्म मानव दर्शन - चिरंतन जीवनदृष्टी - एक अध्ययन' या पुस्तकाची पृ.22-28 पहावीत. येथून पुढे या पुस्तकाचा संक्षिप्त उल्लेख 'एक अध्ययन' येवढाच केलेला आहे.)
जीवनदृष्टी मूलभूत
या संदर्भात समाजाने विकसित केलेली जीवनदृष्टी व समाजाने अवलंबिलेला विकास नमुना यांत अपरिहार्यतेने कारणकार्यभावात्मक घनिष्ट संबंध असतो; कारण विकासाच्या कोणत्याही नमुन्यात -- मानवी व्यक्तिमत्वाचे स्वरुप काय मानले आहे? मानवाच्या विविध प्रेरणांचे समायोजन कशाप्रकारे करण्याचा प्रयत्न आहे? मानवाचे व एकूणच जीवनाचे उद्दिष्ट काय मानले आहे? मानवी जीवनात व्यक्ति-व्यक्ति, व्यक्ति-समाज यांचे नाते कशा प्रकारे लक्षात घेतले आहे? मानवाला प्राप्त होणारी नैसर्गिक संसाधने व एकूण मानवेतर चराचर सृष्टी व मानव यांच्या संदर्भात कसा विचार केला आहे ? समाजात विकसित होणाऱ्या विविध संस्था यंत्रणा, व्यवस्था यांना अधिष्ठानरुप तत्वविचार कोणता आहे? या व्यवस्थांमध्ये व्यक्ति-व्यक्ति, व्यक्ति-समाज यांच्या हितसंबंधांचे समायोजन कसे केले जाते? समाजातील सत्तेचे स्वरुप काय आहे? सत्तावाटपाचे स्वरुप, निकष, माध्यम काय आहे? - या व अशा प्रकारच्या अनेक मुद्यांचा विचार लक्षात घ्यावा लागतो आणि या सर्व प्रश्नांचा संबंध त्या त्या समाजात विकसित झालेल्या, स्वीकारलेल्या जीवनदृष्टीशी असतो. हे लक्षात घ्यावे लागते. या दृष्टीने पाहिले तर पश्चिमी समाजांनी या सर्व प्रश्नांचा विचार करतांना मानवी व्यक्तिमत्वाचा व एकूण जीवनाचा ज्याप्रकारे खंडश: विचार केला आहे व मानवी जीवनाच्या भौतिक अंगावर जो भर दिला आहे. त्यातून आजची अराजक सदृश सांस्कृतिक निर्वाणी निर्माण झाली आहे हे लक्षात येते. (पश्चिमी जीवनदृष्टीच्या विकासाच्या तपशीलासाठी 'एक अध्ययन' मधील परिशिष्ट 1 पहावे)
परंतु आज जेव्हां जगातील विचारवंत विकासाच्या तिसऱ्या पर्यायाचा विचार करीत आहेत तेव्हां मूलत: जीवनदृष्टीचा विचार करणे आवश्यक आहे हे घ्यावे तसे लक्षात घेतले जात नाही असे दिसते. त्यामुळे केवळ विकास प्रक्रियेच्या विविध पैलूंचा असफलतेवरील इलांजाचाच प्राधान्याने विचार जारी आहे असे दिसते. यालाच ऑल्विन टॉफ्लरने engineering solutions असे म्हटले आहे.
आपल्या जीवदृष्टीकडे दुर्लक्ष
स्वतंत्र भारताच्या पहिल्या नेतृत्वाने पश्चिमी जीवनदृष्टीच्या प्रभावातून जेव्हां भांडवलवादी विकासनमुना आणि साम्यवादी विकासनमुना यांच्या संकरातून तयार केलेल्या नमुन्याचा अवलंब केला (पुढे हाच नमुना नेहरुवादी विकासनमुना म्हणून ओळखला जाऊ लागला.) तेव्हां या नेतृत्वाने आपल्या समाजासाठी उपयुक्त विकासनमुना हा आपल्या परंपरापूत जीवनदृष्टीच्या आधारावर विकसित करणे आवश्यक आहे, या गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष केले. महात्माजींनी स्वातंत्र्यचळवळीत पुरस्कारिलेली आपल्या जीवनदृष्टीच्या आधारावरील समाजविकासाची अनेक मौलिक सूत्रे बासनांत गुंडाळून ठेवली आणि आज गेल्या 6 दशकांमधून या विकासनमुन्यांची असफलता समाजजीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये विदारकपणे जाणवत राहिली आहे. पश्चिमेतील सांस्कृतिक अराजकाची पडछाया आपल्याही समाजजीवनाच्या अनेंक क्षेत्रांमध्ये अधिकाधिक प्रमाणात पडू लागलेली दिसते.
एकात्म जीवनदृष्टीची दीनदयाळजीकडून पुन्हा मांडणी
असे विकासनमुने आपल्या समाजासाठीच नव्हे तर एकूणच मानवी समाजासाठी घातक ठरु शकतात आणि या विकासनमुन्यांच्या अंगभूत मर्यादांचे कारण पश्चिमी समाजाने स्वीकारलेल्या जीवनाचा खंडश: विचार करणाऱ्या भौतिकता प्रधान जीवनदृष्टीतच दडलेले आहे, हे स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या पहिल्याच दशकांपासून पू. गुरुजी, पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्यासारख्या विचारवंतांनी समाजासमोर आग्रहपूर्वक मांडायला प्रारंभ केला होता. मानवी समाजाच्या कोणत्याही विकासनमुन्यात मानवी व्यक्तिमत्त्वाच्या व एकूणच जीवनांच्या सर्व अंगाचा एकात्मिक, समन्वित विचार आवश्यक आहे आणि या विचारासाठी हिंदू समाजाने परंपरेने विकसित केलेली एकात्म जीवनदृष्टीच आधारभूत होऊ शकते हे ही आवर्जून प्रतिपादण्यास प्रारंभ केला.
या विचारापोटीच पं दीनदयाळ उपाध्यायांनी एकात्ममानववाद (दर्शन) या नावाने आपल्या पारंपारिक हिंदू जीवनदृष्टीचे युगसंगत सिध्दान्तन करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दुदैवी अपमृत्यूळे या सिध्दान्तनाचा समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांमधील उपयोजनांची व क्रियान्वयनाची सूत्रे सिध्द करण्याचे कार्य अपूरेच राहिले. केवळ आपल्याला अपेक्षित असलेल्या समाजाच्या धारणा-विकास-परिवर्तन प्रक्रिया कोणत्या जीवन विषयक दृष्टिकोणावर आधारित असाव्यात हेच पंडितजी स्पष्ट करु शकले. त्यातल्या त्यात त्या अनुषंगाने आर्थिक क्षेत्राच्या संदर्भातील विचार काही प्रमाणात ते मांडू शकले.
विचारमंथन पुढे नेण्याचे कर्तव्य
आज भारतीय हिंदू समाजाच्या भवितव्याच्या दृष्टीने विचार करणाऱ्या व समाजाच्या विभिन्न क्षेत्रामधील विकासप्रक्रियांमध्ये सक्रिय असणाऱ्या सर्व विचारक-कार्यकर्त्यांनी हे हिंदू जीवनदृष्टीचे युगानुकूल सिध्दान्तन लक्षात घेऊन आपापल्या क्षेत्रातील त्याच्या उपयोजनाचे व क्रियान्वयनाचे विकसनशील आकृतिबंध तयार करण्याची आवश्यकता आहे.
हे करीत असताना, त्यांच्या आकस्मिक निधनामुळे जे तपशील पंडितजी मांडू शकले नाहीत त्यांचाही विचार याठिकाणी करणे आवश्यक आहे.त्यामुळे पंडितजींच्या मांडणीबरोबरच अनेक स्वकीय व परकीय विचारवंतांनी मांडलेल्या चिंतनाचे साहाय्य घेऊन हा विचार पुढे न्यावा लागेल.
या विचारप्रक्रियेत विविध क्षेत्रातील युगानुकूल परिवर्तनाला आधारभूत सैध्दान्तिक चौकट लाभावी व या विविध प्रयत्नांना राष्ट्रीय पुनरुत्थानाचा एकदिशावेध प्राप्त व्हावा म्हणून मूळ चिरंतन हिंदू जीवनदृष्टीच्या युगानुकूल रुपाचे सम्यक, सजग भान कार्यकर्त्यामध्ये निर्माण होणे आवश्यक आहे.
त्यादृष्टीने या ठिकाणी एकात्ममानव दर्शन - चिरंतन हिंदू जीवनदृष्टीचे मूलभूत स्वरुप व आजच्या देशांतर्गत व जागतिक परिप्रेक्ष्यामध्ये या संबंधात उपस्थित होणाऱ्या विभिन्न प्रश्नांचा या जीवनदृष्टीच्या अनुषंगाने अशाप्रकारे निर्वाह होऊ शकतो याची सामूहिक चर्चेच्या माध्यमातून काही ठाशीव रुपरेषा सिध्द व्हावी अशी अपेक्षा आहे. अशा व्यापक चिकित्सक चर्चेसाठी आधारभूत टिपण म्हणून हे टिपण या ठिकाणी प्रस्तुत केलेले आहे.
परंपरेची चिकित्सा आवश्यक
ही चर्चा करीत असतांना ज्याप्रमाणे आपल्या समाजाच्या कालजयी आंतरिक सत्त्वाचे भान ठेवले पाहिजे त्याचप्रमाणे बदलत्या वैश्विक वास्तवाचेही भान ठेवले पाहिजे. पण जसे आपल्या सांस्कृतिक सत्त्वाबद्दलची आत्मश्रध्दा बाळगणे म्हणजे त्या सत्त्वाच्या आंधळया आत्मगौरवाच्या नशेत वहावून जाणे नव्हे, त्याचप्रमाणे आजचे देशांतर्गत व जागतिक वास्तव लक्षात घेणे म्हणजे केवळ अंधानुकरणातून त्याच्या प्रभावाखाली जाणेही नव्हे याचे भान ठेवले पाहिजे. ज्या प्राचीन मूलाधारांवर आपली संस्कृती उभी आहे त्याचे कालसापेक्ष, परिस्थिनिसापेक्ष संदर्भ आज आमूलाग्र बदलले आहेत. त्यामुळे त्यातील शाश्वत काय व परिवर्तनीय काय याचा विवेक करणे आवश्यक आहे. प्राचीन कालसापेक्ष मूल्यसरणीतील आज घातक ठरु शकणारा भाग निर्मम कठोरतेने काढून टाकणे आवश्यक आहे. इतिहासकालात समाजाच्या अवनतीला कारण झालेल्या प्रवृत्ति-प्रेरणांची कठोर चिकित्सा करावी लागेल. त्याचप्रमाणे आजच्या देशांतर्गत व वैश्विक परिस्थितीत निर्माण झालेल्या विविध सांस्कृतिक प्रवाहांतील जे घटक आपले सांस्कृतिक सत्त्व समृध्द करण्यासाठी पोषक असतील त्यांना देशानुकुल रुप देऊन आपल्या सांस्कृतिक सत्त्वात ते कसे रिचविता येतील हे पहाणे आवश्यक ठरेल या संदर्भात स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, म. गांधी, पू. श्रीगुरुजी, विनोबा भगिनी निवोदिता, पं. दीनदयाल उपाध्याय यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्मरण ठेवणे उपयुक्त ठरेल. (युगानुकूल परिवर्तनासाठी मार्गदर्शक तत्वे एक अध्ययन पृ 41-45 पहावीत)
हिंदू जीवनदृष्टीची मूलभूत सूत्रे
येथे उपस्थित असलेल्या बहुतेक सर्वांना ही मूलभूत सूत्रे परिचित असल्यामुळे या ठिकाणी केवळ तत्पर संदर्भासाठी अतिसंक्षिप्त स्वरुपात त्यांचा उल्लेख केला आहे)
1. मानवी व्यक्तिमत्वाची चतुर्विधता - शरीर, मन, बुध्दी, आत्मा - त्यांच्या चतुर्विध प्रेरणा - त्यांचा समन्वित उपशम - पण त्यातून मिळणाऱ्या सुखाच्या तरतम भावात्मक श्रेणी - त्यामुळे ऐहिक व आध्यात्मिक यांचा समतोल परंतु अंतिम सुखश्रेणी वा जीवित - साफल्य आध्यात्मिक हा मूल्यविचार
2. व्यष्टि-समष्टि-सृष्टि-परमेष्ठि-व्यक्तीच्या उत्तरोत्तर उन्नत होत जाणाऱ्या जाणिवेतून विश्व चक्रातील या चारही घटकांचा एकात्म संबंधाची अनुभूती यावी ही धारणा-अखंड मंडलाकार विश्वरचना त्यामुळे सर्व घटकांमध्ये अविग्रही संबंध-व्यक्ति-व्यक्ति, व्यक्ति-समाज, व्यक्ति-सृष्टी यांत कोणतीही प्रतिद्वंद्वात्मकता नाही. व्यक्ति-समाज संबंध हा अवयव-अवयवी स्वरुपाचा संकल्पिलेला
3. या दोन्ही संकलनव्यूहांना आधार देणारे असे तत्वज्ञान - चराचरातील सर्व घटक हे एकाच चैतन्य-तत्त्वाचे विविध पातळीवरील आविष्कार आहेत. त्यामुळे त्या सर्वांमध्ये जैविक एकात्मता आहे हे ते तत्वज्ञान आणि याच अंतिम चैतन्यतत्वाचा साक्षात्कार होणे हे मानवी जीवनाचे आध्यात्मिक साफल्य - या साफल्यात अखंड, निरामय, परिपूर्ण आनंदाची अंतिम श्रेणी प्राप्त व्हावी हे जीवनातील अंतिम प्राप्तव्य! - हे साफल्य एकच असले तरी त्याच्या प्राप्तीचे मार्ग क्षमताश्रेणीच्या सापेक्षतेने भिन्न-भिन्न असू शकतात. (एकं सद् विप्रा: बहुध वदन्ति।)
४. मानवी व्यक्तिमत्त्वाच्या शरीर - मन- बुध्दि - आत्मा या चार मिती व विश्वरचनेतील व्यक्ति-समष्टि-सृष्टि-परमेष्ठि या चार पातळी या दोन संकल्पन व्यूहांमध्ये - मानवी जीवनातील व विश्वव्यापारातील सर्व संदर्भ सामावले जातात. व त्यांना मिळालेल्या अधिष्ठानरुप व तत्वज्ञानामुळे ऐहिक-आध्यात्मिक, वैयक्तिक-सामाजिक अशा सर्व द्वंद्वांचे निराकरण होऊन अद्वैत साधले जाते ही हिंदू जीवनदृष्टीची मुलभूत धारणा आहे.
या दृष्टीने विश्वरचना हे अराजक सदृश संकीर्ण घटित chaos नसून जैविक एकात्मतेवर आधारलेली विविधांगी एकात्म व्यवस्था cosmos आहे असे हिंदू जीवनदृष्टी मानते.
तत्वज्ञान जीवनांत उतरविणे
हिंदू जीवन दृष्टीची ही मूलभूत सूत्रे प्रत्यक्ष आचारणाद्वारा व्यक्ति-समाज जीवनात अनुभवाला यावीत अशा तऱ्हेने काही कर्तव्यसंकेत, वर्तनसूत्रे, यंत्रणा-व्यवस्था प्राचीन दार्शनिकांनी विकसत केल्या होत्या.
1. पुरुषार्थ संकेत - धर्म-अर्थ-काम-मोक्ष या चार पुरुषार्थात अलगता नाही - पुरुषार्थ चतुष्टय धर्माच्या म्हणजेच सामाजिक हिताभिमुख नीतिनियमांच्या आधारावर ('धर्म्य' स्वरुपात) अर्थ कामाची उपासना (ऐहिक प्रेरणांचा उपशम) व त्यातून अंतिम आध्यात्मिक साफल्य - यात व्यक्तिजीवनाच्या चतुर्विध प्रेरणांचे समायोजनाचा संकेत व व्यक्तिसमाज सृष्टी-यांच्या जैविक संबंधाचे भान व्यक्त होते. (अधिक विवरणासाठी 'एक अध्ययन - पृ. 80 ते पृ 85 पहावे)
2 धर्म - निकोप विकसनशील समाजधारणेसाठी योगक्षेमासाठी आवश्यक असलेली सामाजिक नीती - त्यामुळे धर्माची (सामाजिक नीतीची) प्रेरणाही कर्तव्यरुपात पाहिली आहे. ही कर्तव्यसंकल्पना व्यक्तिजीवनात ॠण कल्पनेतून व्यक्त होते. पितृॠण, आचार्यॠण, देवॠण, जन्मत: प्राप्त होतात. असे मानल्यामुळे या ॠणांच्या पूर्तीच्या म्हणजेच कर्तव्यपालनाच्या प्रेरणेला मूलत: परनिरपेक्ष, भावात्मक, करणात्मक, positive स्वरुप प्राप्त होते. ( अधिक विवरण 'एक अध्ययन पृ 92-93)
3. धर्माचे दूसरे अंग आध्यात्मिक साफल्यासाठी करावयाच्या उपासनेच्या स्वरुपात व्यक्त होते. हिंदूंच्या या संदर्भातील विचार हा परमतादराचा आहे. जीवनातील अंतिम साफल्याचे स्वरुप एकच असले तरी त्याच्याकडे जाण्याचे मार्ग भिन्न भिन्न असू शकतात. (एकं सद्....) व हे सर्वही मार्ग क्षमताश्रेणीप्रमाणे एकच अंतिम साफल्य प्राप्त करुन देतात. त्यामुळे यापैकी कोणताही मार्ग त्याज्य तिरस्करणीय नाही व त्यात श्रेष्ठ-कनिष्ठ भावही नाही.
४. आश्रम व्यवस्था (साधन रुपी व्यक्ति विकास) परिपूर्ण मानवी व्यक्तिमत्वाची साधना - क्रमश: विकास यात ऐहिक-आध्यात्मिक व वैयक्तिक-सामाजिक या चारही मितींचा सुमेल साधण्याचा प्रयत्न. या व्यवस्थेसाठी 'आश्रम' ही संज्ञा वापरुन ऐहिकापासून आध्यात्मिकते पर्यंत जीवनभराची अशी ही अखंड साधना आहे. संस्कार देण्याचा प्रयत्न ( एक अध्ययन पृ 79 वरील परिच्छेद पहावा)
याप्रमाणे व्यक्ति-समाज यांच्यातील सर्वप्रकारच्या हितसंबंधाचे संतुलन करुन अनेकविध परस्पर असंगता वा विरोधी प्रवृत्ती-प्रेरणा यांना सामावून घेऊन व्यक्तिसुखाची व समाजस्वास्थ्याची अनुकूलता निर्माण करण्याचा समन्वयात्मक प्रयोग हिंदू जीवनदृष्टीने पूर्णतेला नेलेला होता.
समाजधारणेचे जीवनतत्व
प्राचीन दार्शनिकांनी संकल्पिलेली, अशा प्रकारच्या तत्वज्ञानावर व कर्तव्य-वर्तनसूत्रांवर आधारलेली, समाजव्यवस्था कधीकाळी पूर्णपणे अस्तित्वात होती की नाही हा संशोधनाचा विषय होऊ शकतो पण या संबंधात जे प्राचीन संदर्भ उपलब्ध वाङमयातून मिळतात, त्यावरुन अशा तऱ्हेचे परिपूर्ण व्यक्ति-समाज जीवनाचे स्फुरण व दर्शन हिंदू समाजातील द्रष्टया पुरुषांना झाले होते, हे निश्चितपणे म्हणता येते. त्यामुळे अशा संकल्पनांमधून हिंदू समाजाच्या विकसनशील इच्छाशक्तीची प्रेरणा लक्षात येते. अशा प्रेरणेच्या सर्वकषतेतर परिपूर्णतेवरच कोणत्याही समाजाचे श्रेष्ठत्व अवलंबून असते. या प्रेरणेनुसार घडणाऱ्या प्रात्यक्षिक व्यवहारात परिस्थितीवशात काही कमी जास्त होणे, बदलत्या जीवनाप्रमाणे नवा आशय येणे वा कालबाह्य गोष्टी गळून पडणे हे झाले असेल पण या मूलभूत संकल्पनाचा आदर्श हे हिंदूंच्या समाजधारणेचे जीवनतत्त्व ethos होते यात शंका नाही.
अगदी संक्षिप्त रुपात मांडलेल्या या सैध्दांन्तिक आकृतिबंधातील सूत्राची वर्तमान स्थितीतील देशांतर्गत व वैश्विक परिप्रेक्ष्यातील प्रस्तुतता आणि आवश्यकता पहाणे उपयुक्त ठरेल.
अ-1) ऐहिक - आध्यात्मिकतेचा समतोल
मानवी व्यक्तिमत्वाच्या चतुर्विध मितींच्या जाणिवेचा संस्कार हा आजच्या अतिरिक्त इहवादी उपभोग प्रवणतेतून निर्माण झालेल्या सांस्कृतिक अनवस्थेतून बाहेर पडण्यासाठी आवश्यक व उपयुक्त आहे. त्यातही या चारही मितींच्या प्रेरणांच्या समन्वित उपशमाच्या संकल्पनेतील उत्तरोत्तर वाढत्या सुखश्रेणीच्या अनुभूतीची कल्पना जीवनातील ऐहिक-आध्यात्मिक यांच्या समतोलासाठी आवश्यक आहे.
अशा प्रकारचा ऐहिक आध्यात्मिकतेचा समतोल असणे हे स्वस्थ व्यक्ति-समाजजीवनासाठी आवश्यक असते हे मूल्यही आजच्या समाज वास्तवात लक्षात घेण्याची गरज आहे. 'यतो अभ्युदयनि:श्रेयसासिध्दि: स धर्म: (वैशेषिक दर्शन) ही धर्माची व्याख्या आज समाज विसरला आहे. पश्चिमी इहवादी दृष्टिकोणाच्या प्रभावातून आज ऐहिक प्रेरणा बटबटीत, विधीनिषेधशून्य भोगवादात व्यक्त होते तर पारंपारिक रुढिवादामुळे, आध्यात्मिक प्रेरणा निर्जिव कर्मकांड, तांत्रिक उपचार, मूळ आशय हरवून बसलेल्या हेतूहीन रुढी अशा पारमार्थिक अवडंबरात गुंतून पडते. गेल्या हजार पंधराशे वर्षाच्या इतिहासातील ऐहिकाबद्दलची निकोप, धर्म्य अशा विजिगीषू ईर्षेची क्षीणता व प्रारब्धवादाचा प्रभाव हाही याला कारण आहे. त्यामुळे सनातन दृष्टीला अभिप्रेत असलेल्या व्यक्तिच्या सुविहित योगक्षेमाला व आत्मिक विकासाला उपयोगी अशा प्रकारचे, आध्यात्मिकतेचे सुकाणू असलेल्या शुध्द निकोप ऐहिकतेचे आणि अशा ऐहिकाच्या उपासनेच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या अंतिम आध्यात्मिकतेचे संतुलनच आज आपल्या समाजाला समर्थ, संपन्न व स्वस्थ जीवनाची विकसनशील प्रेरणा देऊ शकेल. आजच्या जागतिक वास्तवात प्राधान्याने उपभोगवादी असलेल्या पश्चिमी इहवादाच्या बेबंध, उन्मादकारी उपभोग प्रवृत्तीतून निर्माण झालेल्या सांस्कृतिक अनवस्थेवरही अशा प्रकारच्या ऐहिक-आध्यात्मिक यांचा सुमेळ हा उपयुक्त उतारा ठरु शकतो.
2) व्यक्ति - समाज - सृष्टी संबंध
व्यक्तींच्या उत्तरोत्तर व्यापक होत जाणाऱ्या जाणिवेतून अखंड मंडलाकार विश्वचक्रातील व्यक्ति-समष्टि-सृष्टि-परमेष्ठि या चारही घटकांच्या एकात्म अविग्रही संबंधांचा संस्कार हाही आजच्या देशांतर्गत वा जागतिक सदर्भात महत्वाचा ठरणार आहे. त्यातून व्यक्ति-व्यक्ति, व्यक्ति-समष्टि, व्यक्ति-सृष्टि यांच्यातील कोणत्याही प्रकारच्या संभाव्य व प्रत्यक्ष प्रतिद्वंद्वात्मकतेचा निरास होऊ शकतो व तो आज आवश्यक आहे.
समाजरचनेच्या कोणत्याही तत्त्वप्रणालीमध्ये व्यक्ति-समाज संबंध हा कळीचा मुध्दा ठरतो. पश्चिमी उदारमतवादी-व्यक्तिवादी मतप्रणालीमध्ये आत्यंतिक व्यक्तिवादातून स्वकेंद्रित, हक्कप्रवण एकांगी मानसिकता निर्माण झाली आहे. व स्वातंत्र्याचे स्वैराचारात रुपांतर झाले आहे. साम्यवाद वा तत्सम सामाजिक प्रणालींमध्ये आवाजवी समानतेच्या आग्रहापोटी समाजाला प्राधान्य मिळाल्यामुळे समाजाचे बराकीकरण होऊन व्यक्तिजीवनाचे पोतेरे बनले.
हिंदू जीवनदृष्टीने व्यक्ति आणि समाज यापैकी कोणत्याही घटकाला स्वयंभू वा मूलभूत मानलेले नाही. व्यक्तिच्या सुखसाधनेला समाजस्वास्थ्याची गरज असणे आणि स्वास्थ्यपूर्ण समाजजीवनासाठी व्यक्तीने आपल्या सुखप्रेरणा व उपभोग समाजहिताच्या मर्यादित ठेवणे हे हिंदू जीवनदृष्टीला अपेक्षित असलेले तत्त्वच व्यक्ति-समाज यांच्या संदर्भातील प्रतिद्वंद्वी मानसिकतेतून निर्माण होणाऱ्या विग्रही अनवस्थेचा निरास करु शकेल.
व्यक्ति-समाज संबंध हे अवयव-अवयवी स्वरुपाचे असतात हे हिंदू जीवनदृष्टीचे गृहीतक या सर्व अविग्रही संबंधाच्या प्रमेयाला अधिष्ठानरुप आहे याचे कारणही हिंदू जीवनदृष्टीने चराचरातील सर्व घटक मूलत: एकाच चैतन्यतत्वाचे विविध पातळीवरील आविष्कार आहेत व त्यामुळे त्याच्यांत जैविक एकात्मता आहे हे मूलभूत सूत्र विकसित केलेले आहे. उत्तरोत्तर व्यापक विशाल होत जाणाऱ्या अस्तित्वाच्या परिचक्रामधील आत्मीय बंध, सामाजिक बांधिलकीच्या संदर्भातही हिंदू जीवनदृष्टीचा एक घन बिंदू आहे.
पश्चिमी संस्कृतीत व्यक्तिच्या हक्कप्रवणतेतून येणाऱ्या करारवजा प्रतिसादी मनोभूमिकेतून सामाजिक बांधिलकीचा भाव निर्माण होतो. अथवा संविधानात्मक नैतिकतेच्या संस्कारातून येणाऱ्या प्रबुध्द नागरिकत्वाच्या (enlightened citizenship)स्वरुपात - म्हणजे वस्तुत: उन्नत कराराच्या स्वरुपातच-व्यक्त होतो. त्याजागी हिंदू जीवनदृष्टीला अभिप्रेत असलेल्या आत्मीय बंधातून आत्मौपम्य बुध्दीतून ही बांधिलकी जोपासली गेली तर केवळ हक्कप्रवण हितसंबंधातून आलेल्या कर्तव्य पालनाच्या मानसिकतेपलीकडे निरपेक्ष प्रेरणेने या सामाजिक बांधिलकीला अधिक दृढ, अधिक परिणामकारक भावात्मक positive अधिष्ठान प्राप्त होऊ शेल (अधिक विवरणासाठी 'एक अध्ययन' पृ. 48-50 पहावे)
अस्तित्वाच्या व्यापक होत जाणाऱ्या परिघावरील मानवेतर चराचर सृष्टिघटकांमध्येही हिंदू जीवनदृष्टी तेच चैतन्यतत्त्व पहाते आणि म्हणून मानव आणि मानवेतर चराचरसृष्टी यांच्यामध्येही हिंदूजीवनदृष्टीने एकात्म संबंधच मानले आहेत व हे तत्त्वही आजच्या वैश्विक परिप्रेक्ष्यामध्ये अनिवार्य व उपयुक्त आहे. पश्चिमेतील मानवकेंद्री (homo centric) आणि निरीश्वरवादी मानववादामुळे (humanism) आज मानवाच्या भौतिक सुखसाधनांच्या निर्मितीसाठी निसर्गाची बेसुमार लूट होताना दिसते. व त्यातून पर्यावरणघातक तंत्रविज्ञानाच्या बेबंध वापरातून एकूण विश्वाच्या भवितव्याबद्दलच चिंता निर्माण झाली आहे. पण पर्यावरण रक्षणाची जी खरी खोटी हाकाटी आज जगात होत आहे त्यात प्रदुषणातून बचावण्याचा नकारात्मक उपायांचाच अवलंब होत आहे व त्या उपायासंबंधीची बंधनेही प्रबल पश्चिमी राष्ट्रे धाब्यावर बसवित आहेत. हे क्योटो करार फेटाळणाऱ्या अमेरिकेच्या उदाहरणावरुन दिसून येते. या अकरणात्मक, प्रतिक्रियात्मक भूमिके ऐवजी हिंदू जीवनदृष्टीने पुरस्कारिलेला मानव-सृष्टी या संबंधातील जैविक एकात्मतेचा विचार हा पर्यावरणरक्षणासाठी भावात्मक (positive) भूमिका विकसित करु शकतो व त्याचीच आज वैश्विक परिप्रेक्ष्यात अतीव गरज आहे. (अधिक विवरणासाठी 'एक अध्ययन' पृ. 63-66 पहावे)
3) ॠण कल्पनेवर आधारित नीती विचार
हिंदू जीवनदृष्टीने विकसित केलेला ॠण कल्पनेवर आधारलेला नीतीविचारांचा संस्कारही आज वैश्विक वातावरणात निर्माण झालेल्या हक्कप्रवणतेवर आधारलेल्या प्रतिसादी नीतीकल्पनेच्या वातावरणात उपयुक्त ठरु शकतो. आज पश्चिमी समाजामध्ये सामाजिक नीतीचे पालन एकतर कायद्याच्या बंधनामुळे अथवा स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी आवश्यक अशा प्रतिसादी कर्तव्यपालनाच्या स्वरुपात होत असते. कायद्यामध्ये केवळ प्रतिबंधात्मक तरतुद असते. नीतिमानतेने वागण्यासाठी आवश्यक ती भावात्मक प्रेरणा नसते. स्वार्थ साधनासाठी होणाऱ्या प्रतिसादी कर्तव्यपालनातही अटळ असेल तेव्हांच कर्तव्य पार पाडण्याची प्रवृत्ती असते त्यामुळेच व्यक्ति स्वार्थसाधनासाठी प्रसंगी कर्तव्यपालनातून पळवाटा काढू शकते. प्रसंगी कायदाही धाब्यावर बसवू शकते. त्या दृष्टीने हिंदू जीवन दृष्टीने विकसित केलेली ॠणकल्पनेवर आधारलेली परनिरपेक्ष नीतिकल्पना ही माणसाला नीतिमान जीवन जगण्याची भावात्मक प्रेरणा देण्याच्या दृष्टीने आज आवश्यक व उपयुक्त ठरु शकेल अशाच नीतीला हिंदूजीवनदृष्टीने धर्म म्हटले आहे. कारण व्यक्ति-व्यक्ति, व्यक्ति-समाज, व्यक्ति-सृष्टी यांच्या संबंधात प्रत्येक घटकाच्या ऐहिक आध्यात्मिक व वैयक्तिक-सामाजिक अशा सर्व प्रेरणांचे संतुलित समायोजन करण्यासाठी आवश्यक अशा सामाजिक आकृतिबंधाची धारणा या स्वयंभू, भावात्मक व कर्तव्यपालनाच्या प्रेरणेतून होऊ शकते (अधिक विवरणासाठी 'एक अध्ययन' पृ. 92-94 पहावे)
४) परमता बद्दल आदरभाव
धर्म या मूल्यातील आध्यात्मिक साफल्यासाठी आवश्यक असलेल्या साधनेच्या मार्गासंबंधी हिंदू जीवनदृष्टीने स्वीकारलेल्या अनाग्रही भूमिकेचीही आज जगाला अतीव आवश्यकता आहे. अंतिम सत्य एकच असले तरी त्याकडे जाण्याचे मार्ग भिन्नभिन्न असू शकतात. व आपल्याला क्षमताश्रेणी प्रमाणे, आपापल्या प्रेरणेप्रमाणे, कल्पनेप्रमाणे जीवनाचे साफल्य गाठण्याचा पूर्ण अधिकार प्रत्येकाला आहे. ही हिंदू जीवनदृष्टीच आज जगात एकेश्वरी पंथांनी मांडलेल्या असहिष्णू विध्वंसक अशा धर्मवेडया थैमानाच्या वातावरणात जगाला तारणार आहे ही परमताबद्दलची अनाग्रही आदराची भूमिकाच लोकशाही जीवननिष्ठेचाही खरा आधार ठरु शकते (अधिक विवरणासाठी 'एक अध्ययन' पृ. 53-63 पहावे) .
५) चार पुरुषार्थ
मानवी जीवनातील वैयक्तिक, सामाजिक व ऐहिक, आध्यात्मिक अशा चारही मितींच्या प्रेरणांचे समन्वित, संतुलित समायोजन करण्याच्या दृष्टीने विकसित केलेल पुरुषार्थ संकेत हेही आजच्या देशांतर्गत व वैश्विक वास्तवात आवश्यक व उपयुक्त आहेत. माणसाला स्वत:चे ऐहिक सुख प्राप्त करुन घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण अर्थकामाची ही उपासना धर्माच्या म्हणजेच सामजिक नीतीच्या बंधनात, समाजहिताच्या मर्यादेत असणे आवश्यक आहे हे पुरुषार्थ कल्पनेतील गृहीतक आहे. आज अतिरिक्त भौतिक सुखाची समाजविघातक, पर्यावरणविघातक हाव (greed) वाढलेल्या वैश्विक वातावरणात हा कर्तव्य संकेत रुजविणे मानवजातीच्या दृष्टीने उपकारक ठरेल. केवळ ऐहिक सुखसाधनेच्या बाबातीतच नव्हे तर पारमार्थिक साफल्याच्या साधनेतही धर्म्य अशा साधने वर पुरुषार्थकल्पनेत भर आहे. त्यादृष्टीनेच 'मोक्ष' या पुरुषार्थप्राप्तीसाठीही 'सर्वभूत हितेरतता' ही महत्वाची पूर्वअट सांगितलेली आहे. याप्रमाणे धर्म्य अशा पुरुषार्थ प्राप्तीतूनच व्यक्ती स्वत:चे सुख, समाजहित, निसर्गाशी समायोजन व अंतिम जीवित साफल्य साधू शकते हा विचार आजच्या सांस्कृतिक अराजकाच्या कालात मानवजातीला स्वास्थ्यपूर्ण व समाधानी सुखाची प्रेरणा देऊ शकेल. (अधिक विविरणासाठी 'एक अध्ययन' पृ. 80-85 पहावे.)
आज पुरुषार्थ संकेताचा विचार करताना आपल्या समाजातील सामाजिक जाणिवेची, पंरपरेत निर्माण झालेली न्यूनता दूर करण्यासाठी पं. दीनदयाळजींनी मांडलेले विचार मार्गदर्शक ठरू शकतात. मधल्या हजार बाराशे वर्षात क्षीण झालेली समाज ही मिती व 'समाज' म्हणून होत असलेल्या विचारात 'पृथगात्म हिंदू समाज' या जाणिवेऐवजी, आध्यात्मिक साफल्याच्या एकांगी प्रेरणेमुळे व्यक्तिवादी भूमिकेतून निर्माण झालेला 'मी आणि इतर मानव' येवढाच भाव दूर करण्यासाठी पंडितजींनी 'दैशिक शास्त्र' या ग्रंथातून 'चिती' व 'विराट' या दोन कल्पना घेतल्या व आजच्या वास्तवाच्या संदर्भात आवश्यक अशा पध्दतीने 'समाज' ही संकल्पना पारंपारिक विचारव्यूहात समाविष्ट केली. त्यानुसार चिती - प्रत्येक राष्ट्राचे म्हणून एक व्यक्तिमत्त्व असते, ते त्याच्या आत्मतत्त्वातून विकसित होते हे आत्मतत्त्व म्हणजेच त्या त्या राष्ट्राची 'चिती' या चितीच्या आधारावरच सामाजिकराष्ट्रीय अस्मिता विकसित होते, हे त्यांनी आवर्जून मांडले. विराट - या राष्ट्रीयसामाजिक अस्मितेच्या आधारावर, राष्ट्रीय साफल्यासाठी, राष्ट्राची इच्छाशक्ती जागृत करणे, राष्ट्राचा पुरुषार्थ जागा करणे म्हणजे 'विराट' जागा करणे. यासंदर्भात समाजाचे शरीर - पुत्ररूप समाजाने विकसित केलेली भूमीदेश म्हणून देश या संकल्पनेत भू-सांस्कृतिक आशय - या भूमीवर परंपरेने एकात्मतेने नांदणाऱ्या जनसमूहाची सामूहिक इच्छा, संकल्प म्हणजे सामाजिक मन, असा संकल्प साकार करण्यासाठी आवश्यक मूल्याशय, यंत्रणा इत्यादी विकसित करणे हे सामाजिक बुध्दीचे कार्य.
समाजाच्या जीवितध्येयाला, सामूहिक संकल्पाला आधारभूत होऊन प्रेरक ठरणारे समाजाचे आंतरिक चैतन्यतत्त्व, सत्त्व अस्मिता हे समाजाचे आत्मतत्त्वचिती.
सामाजिक व्यक्तिमत्त्वाच्या या चार अंगांच्या अनुषंगाने सामाजिक पुरुषार्थाचा विचार संभवतो. समाज अस्तित्वात येण्याची मूळ प्रेरणा हा सामाजिक धर्म हा पुरुषार्थ होय. समाजाच्या सामूहिक इच्छा आकांक्षा, ध्येय सृष्टीचा संकल्प हा सामाजिक काम हा पुरुषार्थ होय. राष्ट्रीय आकांक्षेशी मिळत्याजुळत्या, राष्ट्राच्या अभ्युदयार्थ, विकासाभिमुख सुविहित रचना समाजजीवनात उभ्या करणे हा सामाजिक अर्थ पुरुषार्थ होय. व्यक्तिगत पुरुषार्थाच्या बाबतीत पाहिलेले, 'अर्थ काम हे पुरुषार्थ 'धर्म्य' असले पाहिजेत' हे सूत्र सामाजिक पातळीवर ही आवश्यक असते. समाजाच्या अभ्युदय नि:श्रेयस सिध्दीसाठी आवश्यक ते अनुकूल विचार मानस तयार करणे हा समाजाचा साधनरूप मोक्ष व त्यातून समाजाची ध्येयसृष्टी साकार होणे हा साध्यरूप मोक्ष होय.
या सामाजिक पुरुषार्थ चतुष्टयाच्या चारही मितींच्या अनुषंगाने हिंदू जीवन दृष्टीत हिंदू समाजाच्या चार पुरुषार्थांचा युगानुकूलतेने समावेश करणे ही आजची गरज आहे. (सोदाहरण विवरणासाठी 'एक अध्ययन' पृ. 85-92 पहावे.)
पुरुषार्थ कल्पनेतील सामाजिक आशयाप्रमाणेच नीति विचारातील सामाजिक आशयाला ही उजळा देणे आवश्यक आहे. मुळात सर्व कर्तव्यसंकेत व वर्तनसूत्रे ही व्यक्तिगत साफल्यासाठी, पुण्यप्राप्तीसाठी ही मध्यंतरीच्या काळातील अपुऱ्या संकेतातून निर्माण झालेली कल्पना' व आनुषंगिक तीन ॠणांची संकल्पना दुरुस्त करून 'समाजॠण' या कल्पनेचा समावेश त्यात करणे आवश्यक आहे. 'अन्य कोणी पाळो न पाळो, मी मात्र सामाजिक नीती पाळणारच' अशा तऱ्हेच्या सामाजिक ॠणांच्या कल्पनेवर आधारलेला परनिरपेक्ष कर्तव्यपरतेचा आपल्या नीतिविचारात आज समावेश करणे आवश्यक आहे.
ब-1) आश्रम कल्पना
हिंदू जीवनदृष्टीने विकसित केलेला मूल्याशयतत्त्वविचार प्रत्यक्ष अनुभूतीच्या कक्षेत आणून त्याचे व्यक्ति-समाज-हितासाठी उपयोजन व्हावे यासाठी ज्या यंत्रणा, व्यवस्था, वर्तनसूत्रे निर्माण केली त्यातील आश्रमव्यवस्थेमागील तत्त्वविचार आजही उपयुक्त ठरू शकतो. या चार आश्रमांच्या रूपाने परिपूर्णतेने सिध्द होणाऱ्या विकासावस्थांना 'आश्रम' ही संज्ञा वापरण्यात परिपूर्ण व्यक्ति विकास हा एक समाजाभिमुख, मोक्षदायक अशी अखंड साधना आहे हा संस्कार देण्याचा प्रयत्न आहे. आज केवळ स्वान्त:सुखाय होणाऱ्या व्यक्तिविकासाच्या carrerist मनोवृत्तीऐवजी हा संस्कार समाजाला व्यापक, उन्नत प्रेरणा देऊ शकेल. त्यादृष्टीने 'इदं अनुशासनं' अशा सूत्रातून गुरुने शिष्याला धर्माचे अनुसरण करण्याचा केलेला उपदेश; गुरुच्या व्यक्तिमत्त्वाच्या हितकारक, विकासप्रेरक प्रत्यक्ष सहवासातून निर्माण होणारी विशुध्द ज्ञानलालसा व ज्ञानार्जनातील नैतिकता नैष्ठिकता यांचा संस्कार, अशी सूत्रे प्रबुध्द नागरिकत्वाच्या जोपासनेसाठी आजच्या शिक्षणपध्दतीतही अवलंबिण्याची आवश्यकता व उपयुक्तता आहे. (अधिक विवरण 'एक अध्ययन' पृ. 68-71)
विवाह हा करार नसून संस्कार आहे या भावनेने गृहस्थाश्रमात धर्ममर्यादेत ऐहिक, प्रापंचिक जीवनाचा समृध्द, समर्थ, सुंदर असा समरस अनुभव घ्यावा व समाजजीवनाचा कणा होऊन समाजस्वास्थ्यासाठी स्थिरता व स्वातंत्र्य प्राप्त करून द्यावे हा गृहस्थाश्रमामागील मूल्य विचार तर आज अतीव आवश्यक आहे कुटुंबातूनच अपत्याला आत्मीयता, परस्पर उत्तरदायीत्व, सहभागीत्वाची भावना, सहकार्य, सामूहिक जीवन यांचे संस्कार प्राप्त होत असतात. त्या दृष्टीने समाजधारणा, योगक्षेम, समाजस्वास्थ्य, समाजविकास या संदर्भात व्यक्तीला जबाबदार नागरिकामध्ये विकसित करण्याचे कार्य आजही महत्त्वाचे आहे. (अधिक विवरण 'एक अध्ययन' पृ. 71-73)
प्रपंचातील भोग अनंत, त्यामागील भोगासक्ती अशमनीय आहे हे लक्षात घेऊन ते आपण होऊनच थांबवले पाहिजेत. हा वानप्रस्थाश्रमातील संस्कार स्वास्थ्यपूर्ण, निकोप, विवेकी वार्धक्यासाठी कोणत्याही समाजात आवश्यक असतो. त्याच बरोबर प्रत्यक्ष प्रापंचिक जबाबदारीतून मुक्त होऊन कर्तेपणाच्या जबाबदारीचे पुढील पिढीत सुरळीत हस्तांतरण करणे व आपल्या अनुभवसंपन्न, परिपक्व व्यक्तिमत्त्वाचा समाजाला उपयोग करून देणे. हा वानप्रस्थाश्रमामागील विचार आज आवश्यक आहे. विशेषत: आपल्या समाजातील साधारणत: सुस्थितीत असणाऱ्या वर्गातील कुटुंबसंस्था विस्कळीत होऊन उदयाला आलेल्या वृध्दाश्रम पाळणाघर संस्कृतीच्या काळात खऱ्या अर्थाने सुसंस्कारित सेवाभावी नागरिक निर्माण करण्याचे माध्यम असलेल्या वानप्रस्थावस्थेची अतीव गरज आहे.
संन्यासाश्रमाच्या कल्पनेत आज प्रत्यक्ष भगवी वस्त्रे परिधान करून सर्वसंग परित्याग करण्याचा संकेतच अवलंबिला पाहिजे असे नाही. आजच्या समाजवास्तवात 'मी आणि माझे' ही जाणीव पूर्णत: त्यागून शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी स्वत:चे जीवन समर्पित करणे ही गोष्ट शक्य व आवश्यकही आहे. अशा प्रकारचे सामाजिक सांस्कृतिक कार्य करीत असतानाच व्यक्तिगत अहंकार समष्टीच्या पातळीपर्यंत अथवा विश्वाकार अशा व्यापक, उन्नत पातळीपर्यंत विकसित करणे व त्यातून जीवनाच्या अंतिम साफल्याची 'याचि देही, याचि डोळा' अनुभूती घेणे ही आजच्या वास्तवातील संन्यासाश्रमाची कल्पना असू शकते.
2) बहुकेंद्री समाज व्यवस्था
याशिवाय हिंदू जीवन दृष्टीने समाजाच्या स्वास्थ्यपूर्ण विकासाभिमुख योगक्षेमासाठी काही यंत्रणा, काही संकेत विकसित केले होते. त्यांच्यामागील मूल्याशय व त्यांची आजच्या काळातील प्रस्तुतता हीही लक्षात घेणे उपयुक्त ठरेल.
समाजजीवनाच्या अर्थकारण, उद्योगक्षेत्र, धर्मकारण, शिक्षणक्षेत्र, कलाक्रीडाक्षेत्र, आरोग्य इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये आवश्यक असणाऱ्या यंत्रणा, व्यवस्था स्वायत, स्वयंपूर्ण असाव्यात, तरीही त्यांच्यातील परस्परसंबंध परस्परसंबंध परस्परसंबंध्द, परस्परपूरक असावेत, अविग्रही असावेत आणि अशा व्यवस्थांचे एक व्यापक जाळे या स्वरूपात समाजजीवन विकसित व्हावे ही कल्पना होती. त्यामुळे हिंदू समाजातील सत्तेचे स्वरूपही एक केंद्री नसून बहुकेंद्री होते (multi-centred power structure) आज पश्चिमी समाजविज्ञानात, मानसशास्त्रात, आरोग्य प्रणालींमध्ये नव्याने विकसित होणाऱ्या Systems thinking, Systems approach इ. कल्पनांवर आधारलेली अशीच ही रचना होती, असे म्हणावयास हरकत नाही.
त्यामुळेच अन्य अनेक समाजांमध्ये ज्याप्रमाणे विविध समाजक्षेत्रे राजसत्तेवर अवलंबून आहेत असे मानलेले दिसते. तसे हिंदू जीवन दृष्टीने मानलेले नाही. पश्चिमेतील लोककल्याणकारी राज्याच्या कल्पनेत समाजाचा योगक्षेम, विकास, परिवर्तन आदींची संपूर्ण जबाबदारी शासनाचीच मानलेली आहे. साम्यवादी समाजात राजसत्तेचे समाजाच्या सर्व क्षेत्रांवर निरंकुश वर्चस्व असतेहोते. या दोन्ही व्यवस्थांमुळे एका बाजूला समाजाची आत्मनिर्भरतेची व आत्मविकासाची प्रेरणा क्षीण झाल्यामुळे समाज अकर्मण्य बनतो, तर दुसऱ्या बाजूला ही ऊर्मी हुकुमशाही शासनामुळे कुचंबून जाते. त्यादृष्टीने हिंदू जीवनदृष्टीने विकसित केलेली शासनावर अवलंबून नसलेल्या आत्मनिर्भर, विकासोन्मुख, स्वायत्त, स्वयंपूर्ण संस्थांची कल्पना निश्चितच स्पृहणीय आहे व ती आजही कोणत्याही समाजाच्या निकोप योगक्षेमासाठी व सर्वांगीण विकासासाठी उपकारक व प्रोत्साहक ठरू शकेल.
3) राजसत्ता व समाज संस्थां मधील परस्परपूरकता
याचदृष्टीने हिंदू जीवन दृष्टीने समाजव्यवस्थांमध्ये राज्यसंस्थेला सर्वोपरी महत्त्व दिलेले नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे. राज्यसंस्था हेही अन्य समाजसंस्थांपैकी एक महत्त्वाचे क्षेत्र असेच तिचे स्थान मानलेले आहे. व्यक्तींचे समाजातील अन्यान्य गटांचेसमूहांचे, विविध क्षेत्रांचे, व्यवहार सुविहितपणे, परस्परपूरकतेने, सहकार्य-सामंजस्याने चालले आहेत व सर्वांचा प्रवास सामूहिकतेने व्यक्ति समाज साफल्य साधणाऱ्या एकाच दिशेने चालला आहे हे पाहणे, हा राजसत्तेची प्रमुख जबाबदारी मानली होती. त्याचप्रमाणे अन्य स्वायत्त संस्थांना सिध्द करता येणार नाहीत अशा काही व्यवस्था (पायाभूत सुविधांसारख्या) उभ्या करणे हेही राज्यसंस्थेचे कर्तव्य मानले होते. अंतर्गत सुरक्षा व बाह्य आक्रमणापासून संरक्षण हे इतर यंत्रणांना न जमणारे कार्य राजसत्तेकडे असे. राजसत्ता हे उपभोगाचे नव्हे तर प्रजेच्या सेवेचे, विकासाचे साधन आहे हा संस्कार, 'अर्थकाम-लौकिक जीवनाचा उपभोग हा धर्म्य असला पाहिजे' या पुरुषार्थसूत्रातून देण्याचा प्रयत्न असे. त्या दृष्टीने धर्मराज्य म्हणजे सामाजिक हिताच्या हेतूने, सामाजिक नीतीच्या आधारावर सत्ता राबविणारे राज्य होते (Theocratic State नव्हते) हेही लक्षात येते.
अशाप्रकारे केवळ राजसत्तेवर अवलंबून नसलेला समाज व समाजाच्या अनेक यंत्रणांमधील एक प्रमुख यंत्रणा एवढेच राजसत्तेचे स्वरूप, विकसित होते त्यावेळी राजसत्ता अनियंत्रित होण्याची शक्यता टळण्याचा संभव अधिक असतो. प्राचीन हिंदू जीवनदृष्टीच्या, राजसत्तेचे उद्दिष्ट व मर्यादा यासंबंधीच्या कल्पना स्पष्ट होत्या. त्यामुळे समाजात लोकशक्ती (समाजाची समाजहिताभिमुख विकासोन्मुख प्रेरणा जागविणारी आंतरिक शक्ती) धर्मसत्ता व दंडसत्ता यांत सहकार्य, समन्वय राखण्याचा प्रयत्न असे.
आज देशांतर्गत व जागतिक वास्तवात राजसत्तेचे बाह्य स्वरूप राजेशाहीपेक्षा वेगळे असले तरी राजसत्तेला अधिष्ठान रूप असलेला हा मूल्यविचार आज कोणत्याही समाजाच्या स्वस्थ, समृध्द, विकासोन्मुख योगक्षेमासाठी उपयुक्त व आवश्यक ठरेल असाच आहे.
भ्रष्ट होणे हा राजसत्तेचा स्वभाव आहे व अनियंत्रित सत्ता ही बेबंधपणे भ्रष्ट होऊ शकते हे लक्षात घेऊन हिंदू जीवन दृष्टीने राजसत्तेवर धर्माचा (सामाजिक नीतीचा) अंकुश ठेवण्यासाठी धर्मप्रवण जनशक्तीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, प्रत्यक्ष सत्ता-संपत्ती पासून अलिप्त असलेल्या, ज्ञानशीलसंपन्न, नि:स्वार्थी अशा वर्गाच्या नैतिक सत्तेची संकल्पना विकसित केली होती. (आचार्य जावडेकर - यतिवर्ग, पू. गुरुजी -ॠषिसंस्था, आचार्य विनोबा भावे - आचार्यकुल) धर्म-अधर्म यांचा निर्णय करण्याचा अधिकार राजसत्तेकडे नसून या यतिवर्गाकडेच होता. प्रजा, मंत्रिपरिषद व राजा या सर्वांना व्यक्तिगत चारित्र्यापासून राजधर्मापर्यंत कर्तव्य पालनाचा संस्कार देणारी अशी ही शक्ती होती. त्यामुळेच औपचारिकपणे जरी भारतात राजेशाही नांदत होती तरी हजारो वर्षांच्या इतिहासात उन्मत, अनियंत्रित हुकुमशाही फार करून निर्माण झाल्याचे दिसत नाही.
क हिदू जीवनदृष्टीने विकसित केलेल्या मूल्याशयाचे, कर्तव्य संकेतांचे युगानुकूलतेने उपयोजन करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे व त्यासंबंधी आजच्या समाज वास्तवात उपस्थित होणारे प्रश्न व आक्षेप.
1. जाती संस्था व सामाजिक एकात्मता
हिंदू समाजात प्रस्थापित झालेली जातिसंस्था हा एक अत्यंत जटिल प्रश्न आहे. जातिसंस्थेच्या उत्पत्तींची कोणतीही समाजशास्त्रीय, वास्तववादी मीमांसा आजवर निर्णायकरीतीने होऊ शकलेली नाही. त्यामुळे तिच्या उत्पत्तीच्या प्रश्नात न शिरता लक्षात घेतले पाहिजे की ती सामाजिक दृष्टया अन्यायकारक व विघटनकारी आहे आणि नैतिकदृष्टया मानव्याला काळिमा आणणारी आहे.
समाजातील विविधता ही जरी अटळ असली तरी अशा विविधतेला विभेदाचे, श्रेष्ठ कनिष्ठ भावाचे, विषमतेचे स्वरूप येते तेव्हा ती सामाजिक समस्या बनते हा समाजशास्त्रीय सिध्दान्त या संदर्भात लक्षात घेणे आवश्यक आहे. अशा विषमतेतून सामाजिक एकात्मतेचे भान सुटते व विभेदाच्या घटकांच्या आधारे सामाजिक शोषण सुरु होते अशाप्रकारे समाजातील शोषणाला वाव देणारी, शतकानुशतके समाजाच्या हाडीमाशी खिळलेली ही जातिभावनेची व्याधी तारकालिक, जुजबी वा प्रतिक्रियात्मक उपायांनी नष्ट होणार नाही. त्यासाठी दीर्घपल्ल्याचा, मूलगामी, समाजमनाच्या मशागतीचाच उपाय अवलंबावा लागेल.
त्यासाठी विविध-विभिन्न सामूहिक अस्मितांना सामावून घेणारा व्यापक सामाजिक एकात्मतेचा भाव जागृत करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर सर्व समाजघटकांना आत्मोन्नतीची समान संधी-सुविधा, त्यातून सामाजिक न्यायाची प्रस्थापना व प्रत्यक्षानुभूती येणेही आवश्यक आहे. जन्माच्या आधारावर समाजातील काही घटकांना प्राप्त होणारे विशेषाधिकार व काही घटकांना ज्ञानाचेच नव्हे तर मनुष्यत्वाचेही किमान अधिकार नाकारणे या घातक पैलूंचा ही समूळ निरास झाला पाहिजे. त्याचप्रमाणे समाजाच्या सर्व घटकांना समाजातील गतिविधींमध्ये सन्माननीय सहभागीत्वाची अनुभूती देण्याचा प्रयत्नही आवश्यक आहे.
आज घटनात्मक तरतुदींमुळे व आरक्षणासारख्या आवर्जून अवलंबिलेल्या सक्रिय उपायांमुळे (pro-active) शहर भागामध्ये जातिविचारातून निर्माण होणारा विषमतेचा भाव व त्यातून निर्माण होणारी शोषणप्रवृत्ती ही बरीच कमी झाली असली तरी दरडोई मतदानाच्या लोकशाही प्रक्रियेमुळे जातिजातींच्या एकगठ्ठा मताला महत्त्व आले आहे त्यामुळे जातिविषयक अलग अलग अस्मितांना आवाहन करून त्यातून राजकीय स्वार्थ साधण्याचा खेळ सुरु झाला आहे. आरक्षणासारख्या घटनात्मक तरतुदींमुळे मागासलेल्या समाजाचे सांस्कृतिक उन्नयन होऊन सर्व समाजाने एका पातळीवर येऊन एकात्मतेची अनुभूती घेण्याच्या दृष्टीने सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया गतिमान व्हावी हा घटनाकारांचा हेतू पराभूत झाल्यासारखा दिसत आहे.
त्यामुळे अलग अलग अस्मिता व सामाजिक एकात्मता यांचे सुयोग्य, न्याय्य, विकासोन्मुख संतुलन कसे करावे हा एक जटिल प्रश्न आजच्या समाज वास्तवात यासंदर्भात उभा राहिला आहे. आपल्या संस्कृतीत विकसित झालेला व्यक्ति-व्यक्ती, व्यक्ति-समाज, समाजघटक-व्यापक समाज यांच्यामधील आत्मौपम्य बुध्दीवर आधारलेला एकात्मतेचा बंधुत्वाचा समरसतेचा भाव जागृत करून त्यामधूनच समाजातील विविध घटकांमध्ये निकोप सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया कार्यान्वित करणे. हाच या समस्येवरील भावात्मक चिरस्थायी असा उपाय ठरू शकेल.
परंतु अशा प्रकारच्या अभिसरणासाठी समाजाला भावात्मक संस्कार देण्याची आवश्यकता आहे. हिंदू जीवन दृष्टीने व्यक्ति-समाजघटक व व्यापक समाज यांच्यातील संबंध अवयव- अवयवी स्वरूपाचे मानले आहेत. या पूर्वी उल्लेखिलेल्या मूल्याशयाच्या काही पूर्वअटी यासंदर्भात लक्षात घेणे आवश्यक आहे. हा मूल्याशय व्यक्त करणाऱ्या 'अवयव-अवयवी' या प्रतिमेतील शरीराचा अवयव व शरीर यांच्यातील एकात्मता निर्माण करणारे चैतनतत्त्व हे शरीर व अवयव यांच्या पलीकडचे असते. त्याचप्रमाणे शरीर व अवयव यांना आपले मन, बुध्दी, ईर्षा, प्रेरणा, स्वतंत्र ऊर्जा, स्वार्थभावना वगैरे नसते. समाज व व्यक्ती वा समाजघटक यांच्याबाबत मात्र वस्तुस्थिती भिन्न असते. व्यक्ती ही केवळ अवयवासारखी नसून तिला शरीर, मन, बुध्दी, आत्मा अशा चतुर्विध भिंतींचे परिपूर्ण व्यक्तित्व लाभलेले असते. समाज घटक वा व्यापक समाज यांचेही स्वत:चे म्हणून काही व्यक्तिमत्त्व विकसित झालेले असते. व त्याचा प्रभाव व्यक्तिजीवनावर पडत असतो. म्हणजे व्यक्ती व समाज ही घटिते पूर्णत: निरपेक्षतेने अवयव व शरीर अशा स्वरूपाची नसतात. त्यामुळे हिंदू जीवन दृष्टीने 'अवयव-अवयवी' या प्रतिमेतून संकल्पिलेली व्यक्ति-समाज संबंधाच्या संकेताची प्रत्यक्ष अनुभूती येण्यासाठी संस्कार माध्यमे कार्यक्षम करावी लागतील. विशेषकरून समाजातील दुर्बल घटकांच्या संदर्भात समाजातील सुस्थित घटकांच्या मनातील भाव संस्कारित करावा लागेल. विश्वातील सर्व घटक म्हणजे एकाच चैतन्यतत्त्वाचे विविध पातळीवरील आविष्कार आहेत. व त्यामुळे त्यांत जैविक एकात्मता आहे याच तत्त्वविचाराचा संस्कार जातिभावनेतून निर्माण होणाऱ्या. विघटनकारी वास्तवावरील उपायासाठी उपयोगी पडू शकेल. (अधिक वितरणासाठी 'एक अध्ययन पृ. 96 - 101 पहावे.)
आजच्या समाजवास्तवांच्या दृष्टीने विचार करताना लक्षात येते की आपल्या समाजात परंपरेनेच सामाजिक एकात्मतेचा भाव निर्माण करण्याच्या भावात्मक positive प्रयत्नांचा अभाव दिसतो. 'अंतिम साफल्य आध्यात्मिकच' या मूल्यभावाच्या एकांगी प्रभावामुळे व आध्यात्मिक साफल्य हे व्यक्तिगतच असल्यामुळे हिंदू विचारमानसात विशेषत: गेल्या हजार बाराशे वर्षांमध्ये वैयक्तिक साधनेलाच महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे सर्व लौकिक व्यवहारालाही आध्यात्मिक साफल्याच्या सुकाणूतून वैयक्तिक मितीच प्राप्त झाली. 'सर्वांभूती परमेश्वर' या प्रमेयाने अभिप्रेत असलेला वैश्विक चैतन्याचा भाव 'मी आणि इतर जीव' अशाच मर्यादित स्वरूपात अलगतेने पाहिला जाऊ लागला. रंजल्या गांजलेल्यांची सेवा करण्यालाही 'वैयक्तिक पुण्यप्राप्तीतून आध्यात्मिक साफल्य' हा हेतू जोडला गेला. व्यक्तीच्या आत्मीयतेच्या वाढत्या परिघातील व्यक्ति-समाज-सृष्टी परमेष्ठी या वर्तुळातील मधल्या कडया गळून एकदम परमेष्ठींचीच आस उत्पन्न झाली. त्यामुळे आत्मीय बंधातून सामाजिक एकात्मतेचा भाव विकसित होण्याची प्रक्रिया क्षीण झाली. समाजाच्या संदर्भात जेव्हा जेव्हा विचार झाला तेव्हा हिंदू मानसात 'मी व इतर मानव' येवढाच विचार राहिला असे दिसते.
2) राष्ट्रजीवनाचे पुनर्निर्माण
आत्मीय बंधातून विकसित होणाऱ्या सामाजिक एकात्मतेच्या जाणिवेच्या अभावामुळे आपल्या समाजात आवश्यक ते सामाजिक अभिसरण होऊ शकले नाही व राष्ट्रीय आपपरभावही आवश्यक त्या स्वरूपात विकसित होऊ शकला नाही. त्यादृष्टीने राजसत्तेमागील पारंपारिक मूल्याशयात परकीय आक्रमणांच्या काळात बदल करण्यातील असमर्थता लक्षात घ्यावी लागते. (या सर्वच विषयाच्या अधिक विवरणासाठी '0 एक अध्ययन' मधील 'हिंदू समाजाच्या अवनतीची मीमांसा' हे परिशिष्ट 3 पहावे.) परकीय आक्रमकांकडून ज्यावेळी आपल्या सांस्कृतिक सत्त्वावर आघात होऊ लागले तेव्हा अंतर्गत सुरक्षा व बाह्य आक्रमणापासून रक्षण' वा पारंपरिक कर्तव्याच्या पलीकडे जाऊन राजसत्तांनी समान शत्रुमित्रभावातून एकत्र येऊन संस्कृतिरक्षण करणे आवश्यक होते. जेव्हा अन्य सांस्कृतिक समाजांशी शत्रुभावाने हिंदू समाजाचा व्यापक प्रमाणात व सातत्याचा संबंध आला नव्हता तेव्हा मूलत: मानवतावादी असलेल्या, सांस्कृतिकदृष्टया एकजिनसी असलेल्या आपल्या समाजात राष्ट्रीय पृथगात्मतेची जाणीव निर्माण होण्याची शक्यता नव्हती. पण एकेश्वरी पंथाच्या कडव्या, विध्वंसक आक्रमणानंतरही व्यक्तिगत दृष्टिकोण व आध्यात्मिकतेचा एकांगी प्रभाव यामुळे असा राष्ट्रीय आपपरभाव निर्माण होऊ शकला नाही व हिंदू समाज पारभूत झाला. (परिशिष्ट 3 पहावे.)
आमची विशिष्ट सांस्कृतिक एकात्मता हा जर आमच्या राष्ट्रजीवनाचा आधार असेल तर त्या संस्कृतीला राजसत्तेचे संरक्षण प्राप्त होणे आवश्यक आहे. हा बोध गेल्या हजार बाराशे वर्षांच्या इतिहासातून आपण घेतला पाहिजे. पण असे करणे म्हणजे राष्ट्र व राज्य यांचा एकंकार करणारी 'Nation-State' हा कल्पना स्वीकारणे नव्हे, तर सांस्कृतिक राष्ट्री पृथगात्मतेच्या पाठीशी राजसत्तेचे केवळ संरक्षक बळ उभे करणे हा साध्य-साधन भाव जागा ठेवावा लागेल. पं. दीनदयाळ उपाध्यायांनी पुरस्कारिलेल्या 'विराट' जागविण्याच्या कल्पनेत ही हाच आशय आहे. आजच्या वैश्विक वास्तवात अशाप्रकारचा पृथगात्म राष्ट्रीय भाव निर्माण करणे म्हणजे कोणत्याही प्रकारची संकुचितता नाही किंवा हा राष्ट्रीय भाव व आंतरराष्ट्रीयता वा मानवतावाद यांच्यांतील विसंवादही नाही. व्यक्ति-समाजाच्या उत्तरोतर उन्नत होत जाणाऱ्या जाणिवेतून राष्ट्रीय भावनेपासून स्वाभाविकरीत्या मानवतेपर्यंत विकास होण्यात कोणतीही अडचण नाही. उलट मानवतेबद्दलची आस्था निर्माण होताना राष्ट्रीय भावना शिथिल झाली तर मानवतेसाठी उभे ठाकण्याची समाजाची इच्छाशक्ती व ऊर्जा क्षीण होते. हा आपल्या राष्ट्राचा इतिहास आहे. आपल्या जीवनदृष्टीत केवळ अखिल मानव्याचाच नव्हे तर संपूर्ण एकात्म विश्वाचा विचार आहे. परंतु या जीवनदृष्टीचा संपूर्ण मानवजातीच्या हितासाठी, विश्वकल्याणासाठी उपयोग होणे ही अपेक्षा असेल तर त्यासाठी हिंदू समाज समर्थ, समृध्द स्वरूपात विकसित होणे अत्यावश्यक आहे. आजच्या वैश्विक वास्तवात आपले दुबळे राष्ट्रजीवन जगाला कोणताही तत्त्वमूल्यविचार देऊ शकणार नाही आणि आपला सनातन समाजच जगाला आजच्या सांस्कृतिक अराजकातून मार्ग दाखवू शकेल ही आपली श्रध्दा असेल तर या प्रक्रियेचा मोहिम तळ (Base of operation) भारत व हिंदूसमाजच असू शकेल. त्यासाठी आजच्या आंतरराष्ट्रीय वास्तवात सांस्कृतिक एकात्मतेच्या जाणिवेतून विकसित होणाऱ्या राष्ट्रीय आपपरभावाच्या प्रखर जाणिवेवर उभ्या असलेल्या राष्ट्रजीवनाचे पुनर्निर्माण केले पाहिजे.
3) आधुनिक धर्म संकल्पना
हिंदूजीवन दृष्टीने अंतिम साफल्याच्या दृष्टीने विकसित केलेल्या अनाग्रही अशा आध्यात्मिक साधनाउपासना या धर्माच्या अंगांचाही वर्तमान समाजवास्तवात पुनर्विचार आवश्यक आहे. त्यासाठी परंपरेने उपासनेने शिरलेले निर्जीव कर्मकांड, बाह्य उपचारांचे अवडंबर, पंथील अभिनिवेश, पोकळ उत्सवी स्वरूप, अंधश्रध्दा, समाजाच्या अंधश्रध्देचा बाजार मांडण्याची प्रवृत्ती, उपासना आणि सामाजिक नीती यांची फारकत इ. दोषांचा निरास केला पाहिजे व उपासनेचे व्यवहार्य, सुलभ व मूल्यानुसारी शुध्दीकरण केले पाहिजे.
आज सर्व धर्मपंथांच्या सहअस्तित्वाची निकोप धारणाच जगाला, धर्माच्या नावे पोसलेल्या आतंकवादापासून वाचवेल ही आपली श्रध्दा असेल तर हिंदूंच्या धार्मिक उपासनेत शिरलेल्या वरील अनिष्ट प्रवृत्तींचा निरास करून हिंदू धर्म अधिक जोमदार पणे धर्माच्या आध्यात्मिक तत्त्वज्ञानाच्या व्यवहार्य स्वरूपात सिध्द करणे आवश्यक आहे. त्यासाठी धर्मांतरितांच्या व्यापक शुध्दीकरणा बरोबरच आग्रही प्रसरणशीलतेचा अवलंब केला पाहिजे. आजच्या सांस्कृतिक अराजकाच्या संत्रस्त जागतिक वातावरणात 'एकं सद् ..... ' अशा सूत्रांवर आधारलेले हिंदूंचे अनाग्रही आध्यात्मिक तत्त्वज्ञान, त्याचा युगानुकूल उपयोजनात्मक आकृतिबंध व उपयोजनाची व्यवहार्य माध्यमे यांच्यासह हा धर्म जगाला देण्याची गरज आहे. त्यासाठी धर्माबद्दलच्या विवेकी अस्मितेतून हा संस्कार देणारी व्यापक यंत्रणा उभी करावी लागेल. या विश्वाच्या शांत, समाधानी, विकसनशील योगक्षेमाच्या प्रक्रियेचा मोहिमेतळ हिंदू धर्माच्या अधिष्ठानावरील हिंदू समाजच असेल हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
4) समाजाच्या संघटित शक्तीची जनचेतना
मदांध होऊ शकणाऱ्या राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश ठेवणाऱ्या यतिवर्गाचा पारंपारिक मूल्याशयाचा संदर्भात उल्लेख केला होता. आजच्या समाजवास्तवात समाजातील प्रबल व्यक्ती, समाजगट वा सत्ताधीश यांच्या समाजविघातक प्रवृत्तींच्या नियंत्रणाचा, दमनाचा प्रश्न अधिक जटिल झाला आहे. इतिहासकालात समाजातील धर्मप्रवृत्तींचा संस्कार प्रखर असल्याने यति वर्गाच्या नैतिक शक्तींचा अनिष्ट प्रवृत्तींवर प्रभाव असे. अनाचारी व्यक्तींचे वर्तन कसेही असले तरी मूल्यश्रेणी पारंपरिक समाजिक नीतीला धरूनच असे, आज पश्चिमी जीवनदृष्टीच्या प्रभावातून समाजातील अपप्रवृत्तींना पश्चिमी इहवादी भोगप्रवृत्तीचे तात्त्वि समर्थन मिळाले आहे. या अपप्रवृत्ती केवळ व्यक्तिरूपातच नव्हे तर सामूहिकतेनेही व्यक्त होतात. अशावेळी केवळ नैतिक शक्तींच्याद्वारे त्यांचे नियंत्रण होऊ शकत नाही हा आजचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांचे दमन राजसत्तेच्या दंडनीतीनेच होऊ शकते. पण राजसत्ताही भ्रष्ट झाल्याचा अनुभव येतो त्यावेळी हा प्रश्न जटिल बनतो. अशावेळी हिंदू जीवनदृष्टीने विकसित केलेली स्वायत्त व्यवस्थायंत्रणांनी कार्यान्वित होणारी समाजसंकल्पना उपयोग पडू शकेल असे वाटते. अशा राजसत्तेवर अवलंबून नसलेल्या स्वायत्त संस्थामधून सामाजिक हिताच्या भूमिकेतून होणाऱ्या नैतिकतेच्या परिपोषातून, या स्वायत्त संस्थांच्या संघटित नैतिक बळाचा अंकुश राजसत्तेवर राहू शकेल. अशा स्वायत्त संघटनांच्या द्वारा व्यक्त होणाऱ्या लोकमानसाची संघटित नैतिक जनचेतना ही कोणत्याही स्वरूपाच्या लोकशाही राज्यव्यवस्थेत प्रभावी शक्ती ठरू शकते. अशा संघटित नैतिक जनचेतनेलाच पं. दीनदयाळजींनी 'विराट' म्हटले आहे. आज केवळ राज्यकर्ता वर्ग, सत्ताधारी गटच अन्याय शोषण करीत आहेत असे नाही. तर समाजाचा एक घटक सामूहिकतेनेच दुसऱ्या समाजघटकावर सामूहिकरीत्याच अन्याय करताना दिसतो. शोषणाच्या या बदलत्या स्वरूपामुळे व्यक्तिकेंद्री यतिवर्गाची नैतिक शक्तीही हतप्रभ ठरते हा अनुभव आहे. त्यामुळे यतिमन: स्थितीतील नेतृत्वाखालील धर्मप्रवण, नीतिप्रवण अनुशासित, क्रियाशील समाजाच्या संघटित शक्तीची जनचेतना हेच या समस्येला उत्तर आहे. (अधिक विवरण - 'एक अध्ययन' पृ. 109-112)
ड - वर्तमान समाजातील परंपराविरोधी, तथाकथित पुरोगामी विचारमानसातून हिंदूजीवनदृष्टीवर येणाऱ्या आक्षेपांचा विचार-
1) स्त्री - पुरुष समानता
हिंदूजीवनदृष्टी पुरुष प्रधानतेतून स्त्रीचे स्वातंत्र्य संकुचित करणारी, स्त्रीवर अन्याय करणारी, स्त्रीपुरुष समानता न मानणारी आहे असा एक आक्षेप येत असतो. यासंबंधी विचार करताना लक्षात येते की हिंदू जीवनदृष्टीने केलेल्या स्त्रीजीवनासंबंधीच्या विचारातून आपल्या परंपरेत स्त्रीच्या सन्माननीय स्थानाची व तिच्या अवनत अवस्थेची अशी दोन्ही प्रकारची उदाहरणे मिळतात. एक नक्की आहे की गेल्या हजार वर्षांमध्ये अनेक कारणांनी स्त्रीला अवनत, गौण स्थान प्राप्त झाले व आजही ती गोष्ट कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अनेक संदर्भांतून व्यक्त होत असते. जनुकसूत्रानुसारच अंगभूत असलेला भोगवादी, आक्रमक असा पुरुषी अहंकार व जुळवून घेण्याची नमते घेण्याची स्त्रीची स्वाभाविक प्रवृत्ती व शारीरिक मर्यादा यांच्या परस्पर प्रतिक्रियांतून आजवर सर्वच समाजांमध्ये स्त्रीपुरुष संबंध निर्णित झालेले दिसतात. याला आज पश्चिमी समाजही अपवाद नाहीत. पण स्वाभाविकतेवर, नैसर्गिकतेवर संस्कार करून जीवित साफल्यासाठी या प्रवृत्तींचे उन्नयन करणे म्हणजेच संस्कृती विकसित करणे. त्यादृष्टीने हिंदू जीवनदृष्टीने प्राचीनकाळी अनेक माध्यमांमधून स्त्रीचे सन्माननीय स्थान समाजात व पुरुष मानसात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्याची उदाहरणे दिसून येतात. आजच्या समाजवास्तवत प्राचीन काळचे चित्र जसेच्या तसे पुन्हा प्रस्थापित करणे हे शक्यही नाही व आवश्यकही नाही. परंतु स्त्री व पुरुष दोघेही आपापल्या परीने अपूर्ण असून त्यांच्या जीवनाच्या परिपूर्णतेच्या, साफल्याच्या दृष्टीने अत्यंत निकोप सामंजस्याच्या व सहकार्याच्या पायावर दोघांनी सहजीवन विकसित करणे आवश्यक आहे. आत्मौपम्य बुध्दीच्या आधारावरील उत्कट आत्मीय बंध (परस्परप्रेम) व कर्तव्यप्रवण भावना हेच या सहजीवनाचे अधिष्ठान असू शकते. त्यासाठी निसर्गाने या दोन्ही घटकांकडे दिलेल्या विशेष जबाबदारीची योग्य जाणीव व निसर्गानेच निर्माण केलेल्या त्यांच्या परस्परपूरकतेच्या आधारे परिपूर्ण संयुक्त जीवनाची प्रेरणा, यांतून समाजाचा कणा असणाऱ्या गृहस्थाश्रमाचे जबाबदार, धर्म्य पालन ही आजची गरज आहे. त्यासाठी कुटुंबातील श्रमविभाजन हे अधिकार श्रेणीतून न होता जबाबदारीच्या जाणिवेतून होणे आवश्यक आहे. त्यासाठी पुरुषी अहंकाराचा निरास व स्त्रीची विवेकी आत्मप्रस्थापनेची संयमी ऊर्मी जागृत करणे, दोन्ही आवश्यक आहे. पण त्याचबरोबर स्त्रीपुरुष समानता म्हणजे स्त्रीने पुरुषी बनणे नव्हे तर उभयंतामधील समान सन्मानाची भावना हे लक्षात घेतले पाहिजे. स्त्रीच्या पुरुषनिरपेक्ष व्यक्तिमत्वात जसे तिचे मानव्य आहे तसेच मातृत्वही आहे. त्यातून येणारी संस्कारकारी मातृशक्तीची जाणीव तिनेही जपली पाहिजे व पुरुषी समाजानेही तिचा आदर केला पाहिजे. एक पुरुष, शिकला तर एक व्यक्ती शिकते, एक स्त्री शिकली तर सारे कुटुंब शिक्षित संस्कारित होते - स्वामी विवेकानंद, म.फुले, म.गांधी, आचार्य विनोबा.
या साऱ्या मूलभूत मूल्याशयाच्या आधारेच आजच्या समाजजीवनातील शहरातील सुस्थित, नोकरदार, व्यवसायी स्त्रीजीवन, झोपडपट्टीतील स्त्रीजीवन, ग्रामीण स्त्रीजीवन, उच्चभ्रू समाजात भोग लालसेच्या उपशमाचे माध्यम म्हणून प्रस्थापित होऊ पहाणारे प्रदर्शनीय स्त्रीजीवन अशा स्त्रीजीवनाच्या विविध पातळींचा विचार करावा लागेल. त्याचप्रमाणे नवतंत्रज्ञानाचे, जागतिकीकरणाचे, अतिरिक्त शहरीकरणाचे स्त्रीजीवनावरील परिणाम, पश्चिमी जीवनदृष्टीच्या प्रभावाचे स्त्रीजीवनावर झालेले परिणाम यांचाही विचार करावा लागेल.
2) हिंदू जीवनदृष्टी व विज्ञान
हिंदू जीवनदृष्टी विज्ञान विरोधी आहे असाही एक आक्षेप असतो. वस्तुत: प्राचीन काळी भारतात निर्माण झालेली भौतिक प्रगती व तज्जन्य वैभव, विज्ञानाच्या उपासनेशिवाय, शुध्दज्ञानशास्त्रे व उपयोजित शास्त्रे अशा दुहेरी विचाराशिवाय शक्यच नव्हते. पण विज्ञानाची उपासना ही सामाजिक नीतीच्या निकषांवरच होणे आवश्यक आहे हा दंडक होता. आज विज्ञानाचे बेबंध उपयोजन समाज विघातक व पर्यावरण विघातक पध्दतीने होत असताना हा दंडक महत्त्वाचा ठरतो. ऑल्विन टॉफ्लरने याच दृष्टीने पुरस्कारिलेली Technological Ombudsman ची कल्पना लक्षात घेण्यासारखी आहे. विज्ञान व धर्म, विज्ञान व अध्यात्म यांत कोणताही विरोध नाही. हे डॉ. अब्दुल कलामांसारख्या अनेक जागतिक शास्त्रज्ञ विचारवंतांनी आवर्जून सांगितलेले आहे.
मध्यंतरीच्या काळातील विज्ञानाच्या उपासनेत निर्माण झालेला खंड, त्यामधील अनेक त्रुटी दूर करून आज विज्ञानाची उपासना आपल्याही समाजात मोठया यशस्वीरीत्या होत आहे. त्या उपासनेत हिंदू जीवन दृष्टीने पुरस्कारिलेल्या सामाजिक हिताच्या नैतिक मर्यादेचे भान ठेवले तर धर्म-अध्यात्म- विज्ञान यांच्या समन्वयाचे विकसनशील नमुने त्यातून उभे राहू शकतील असा विश्वास वाटतो. (अधिक विवरण 'एक अध्ययन' पृ. 115-117.)
3) परिवर्तनशीलता
हिंदू जीवनदृष्टी परिवर्तन विरोधी, स्थितिप्रिय आहे असाही एक आक्षेप असतो, हाही बरोबर नाही हजारो वर्षे जीवमान असलेला समाज केवळ स्थितिशीलतेवर जीवमान असलेला समाज केवळ स्थितिशीलतेवर जीवमान राहूच शकत नाही. कोणत्याही सेंद्रिय संरचनेच्या जीवमानतेच्या संदर्भात निसर्गालाच अशी स्थितिशीलता मानवत नाही. पण हिंदू संस्कृतीने विकसित केलेल्या परिवर्तन प्रक्रियेत क्रांती नव्हे तर प्रगतिशील उन्मीलनाची प्रक्रिया अभिप्रेत आहे, हे लक्षात घेतले जात नाही. क्रांतीतून प्रांतिक्रांती होते हे सामाजिक गतिशास्त्राचे भान हिंदूंच्या परिवर्तन प्रक्रियेमागे आहे म्हणून संघर्षशीलता टाळून समन्वयाची भूमिका अनुसरली गेली. अर्थात आजच्या समाज वास्तवात, प्रसंगी समाजातील अपप्रवृत्तींचा बिमोड करून परिवर्तनासाठी संघर्षही करणे आवश्यक असते यांचे भाव ठेवले पाहिजे. त्याचबरोबर परिवर्तन म्हणजे परिस्थितीच्या रेटयाखाली आपध्दर्माच्या मानसिकतेने स्वीकारलेले बदल नव्हे तर समाजाच्या आंतरिक चैतन्यशक्तीने बदलल्या परिस्थितीला दिलेला जिवंत, विकसनशील विवेकी प्रतिसाद असतो हेही लक्षात ठेवले पाहिजे. खऱ्या परिवर्तनामध्ये आवश्यक बदलाचा तत्त्वत: व व्यवहारात: मोकळया मनाने, निकोपप्रवृत्तीने, जीवनदायी प्रगमनशीलतेने केलेला स्वीकार असतो. त्यामुळे केवळ वर्तनातील बदल नव्हे तर मानसिकतेतील बदल हे खरे परिवर्तन असते हे आज लक्षात घेतले पाहिजे (अधिक विवरण 'एक अध्ययन' पृ. 117-119)
4) संयत उपभोग
हिंदू जीवनदृष्टीला भोगापेक्षा त्यागाचे आकर्षण आहे व तिने दारिद्रयाचे उदात्तीकरण केले आहे असा एक आक्षेप घेतला जातो. हे लक्षात घेतले पाहिजे की कोणताही समाज केवळ त्यागावर उभा राहू शकत नाही. प्राचीन काळचे समाजाचे वैभव दारिद्रयाचे उदात्तीकरण करून केवळ त्यागातून उत्पन्न होणे शक्य नव्हते. पण यासंदर्भात भोग प्रवृत्ती व भोगवाद यांतील फरक लक्षात घेतला पाहिजे. भोगवादात भोग हेच अंतिम उद्दिष्ट असते. म्हणून हिंदू जीवन दृष्टीने अशा भोगासक्तीच्या निरासासाठी 'संयत उपभोगाचे' सूत्र सांगतानाच त्यागाचे महत्त्व सांगितले आहे. त्याचप्रमाणे विवेकी, मर्यादशील उपभोगासाठी 'तेन त्यक्तेन भुञ्ज्ीथा: हा संकेत उपदेशिला आहे (अधिक विवरण - 'एक अध्ययन पृ. 113-115.)
समारोप - अशी ही जीवनदृष्टी आजच्या समाज वास्तवात कशी उपयोजित करावयाची हा खरा प्रश्न आहे. त्यासाठी समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये या जीवनदृष्टीच्या मूल्याशयाच्या आधारावर, युगानुकूल क्रियान्वयनाचे आकृतिबंध तयार करावे लागतील. आजच्या समाजवास्तवातून या प्राप्तव्याकडे जाण्यासाठी क्रमविकासाचे टप्पे ठरवावे लागतील. कारण हे स्थित्यंतर जादूची कांडी फिरविल्यासारखे होऊ शकणार नाही. मूलत: समाजाची जीवनदृष्टी बदलण्याचे हे काम आहे व ते धीम्या सातत्याच्या प्रयत्नानेच होऊ शकते. याचे भान ठेवले पाहिजे. (अधिक - विवरणासाठी - 'एक अध्ययन' मधील समारोप हा भाग पहावा.)
- बापू केंदूरकर
एकात्म मानव दर्शन -चिरंतन हिंदू जीवनदृष्टी
संदर्भग्रंथ
१) पं.दीनदयाळ उपाध्याय विचारदर्शन : श्री. वि.वा. नेने - खंड १
२) अथातो तत्वजिज्ञासा : श्री. द.बा.ठेंगडी (पं.दीनदयाळ उपाध्याय विचारदर्शन -- प्रस्तावना )
३) पं.दीनदयाल उपाध्याय - : डॉ. महेशचंद्र शर्मा
व्यक्तित्व और विचार
४) एकात्म मानव दर्शन - : गं. भा. कानिटकर
वर्तमान संदर्भात
५) एकात्म मानव वाद : दि.घ.दातार
६) दैशिक शास्त्र : बद्रिसाह टुलधारिया
७) वैदिक संस्कृतीचा विकास : लक्ष्मणशास्त्री जोशी
८) भारतीय संस्कृतीकोश खंड ८ वा : डॉ. श्री.व्य.केतकर
९) वेदातील राष्ट्रदर्शन ( उत्तरार्ध ) : बाळशास्त्री हरदास
१०) स्त्री शक्ती : आचार्य विनोबा भावे
११) धर्म आणि समाजपरिवर्तन : गं. बा. सरदार
१२) महिकावतीची बखर : संपादन - इतिहासाचार्य राजवाडे
१३) राजवाडे लेखसंग्रह : साहित्य संस्कृती मंडळ
१४) महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचा विकास : प्रा.नलिनी पंडित
१५) आधुनिक भारत : आचार्य शं. दा. जावडेकर
१६) संस्कृती संभ्रम : डॉ. ग. ना. जोशी
१७) वेगळ्या विकासाचे वाटाडे : दिलीप कुलकर्णी
१८) रानडेप्रणीत सामाजिक : गं. बा. सरदार
सुधारणेची तत्वमिमांसा
१९) संस्कृती-संगम :श्री. द.के.केळकर
२०) समाज आणि धर्म : जयंत गडकरी
२१) हिंदू समाज - संघटना आणि विघटन : डॉ.पु.ग. सहस्रबुद्धे
२२)हिंदुत्व - जुने संदर्भ, नवे अनुबंध : मा.गो. वैद्य
२३) भारतीय संस्कृतीचा पाया : श्री अरविंद
२४) शतक शोधाचे :प्रा.मोहन आपटे
२५) Integral Humanism : Shri Guruji, Deendayal Upadhyay, D.B.Thegadi
२६) I verses We/ मै या हम :विश्वनाथ लिमये
२७) Human life and Cosmic Life : Devadatta Kanitkar
२८) The Third Wave : Alvin Toffler
२९) Power Shift : Alvin Toffler
३०) The Turning Point : Fritjof Capra
३१ ) The Web of Life : Fritjof Capra
३२) The New Class : Milovan Djilas
३३) The Clture of Narcissism : Christopher Lasch
३४) The Protestant Ethics and The Spirit of Capitalism : Max Waber
३५) self and Identity in Modern psychology and Indian Thought : Dr. Anand paranjape
३६) A Hindu Mind : Pratap Chandra
३७) Voluntary Simplicity : Duane Elgin
३८) Integral Humanism : K .Ramachandra Rao
३९) Democracy Today - Problems & Prospects - Seminar Paper : Ed. By.W.N.Chambers and R.H.Salisbury (harward)
४०) Age of Ideology - Political Thoughts : Fredricks M. Watkins
अभिनंदन.मिलिंद
ReplyDeleteसुंदर विश्लेषण
ReplyDelete